Sunday, May 29, 2011

छानसे स्वप्नं ............!


काल मी एक छानसे स्वप्नं पाहिलं..
माझं स्वतःच चिमुकलं घर ..
त्या घरात मस्त एक दिवाणखाना ..
त्या दिवाणखान्याच्या शुभ्र भिंतीवर ..
लावलेली एक काचेची फ्रेम .. पण रिकामी
विचार केला काय बर लावावे ..त्या फ्रेम मध्ये ..

लावावा एखादा फोटो भारताला महासत्तेची स्वप्नं..
दाखवणाऱ्या एखाद्या उमद्या वेक्तीचा ...
कि लावावा आजच्या राजकारण्याचा ?
पण नकोच ...!
त्यांची लायकीच नाही .....
लावावा तेथे फोटो....स्वतंत्र भारतात-
आत्महत्या कराव्या लागलेल्या
एका कर्जबाजारी शेतकऱ्याचा ..?

कधीतरी त्यात लावता येईल फोटो.....
स्री-भ्रूणहत्त्येत सामील एखाद्या वर वर मुलीचे
गोडवे गाणाऱ्या एखाद्या उच्चशिक्षित पांढरपेशा
नालायक माणसाचा ...!.
अथवा.....
माणूसकीला काळीमा फासून......
गरीब माणसाच्या किडनी सारख्या
अवयवांची तस्करी करणा-या अन मुलगा कि मुलगी
आहे हे पैसे घेऊन सांगणाऱ्या क्रुर डॉक्टरचा ...!

या फ्रेम मधे रंग भरीन म्हणतो.....
गद्दार देशद्रोहींच्या रक्ताचा....!
कसाब सारख्या लोकांचा पाहुणचार करणाऱ्या
अन आमची सहनशक्ती पाहणाऱ्या कठोर सरकारचा ...!
भ्रष्ट्राचारात बुडलेल्या ..भूखंड हडपणाऱ्या नेत्यांचा ...!

पण मी सर्व सामान्य गरीब माणूस ..फार तर ..
फोटो लावील एखाद्या देव-देवतेचा आणि प्रार्थना
करील कि .. हे देवा या लोकांच्या हातून सत्कार्य घडू दे ..
चांगले विचार येऊ दे त्यांच्या मनात ..
आणि त्यांना माणुसकीची जाणीव असू दे ....!!
दुसराहि आपल्यासारखा माणूसच आहे ..हे समजू दे ....!!


सनी... एक वेडा मुलगा..!

Friday, May 20, 2011

उद्या मी गेल्यावर .....!

कदाचित उद्या ..
मी नसेलहि या जगात ..
पण मी हे जग सोडून गेल्यावर ..
माझेसाठी फक्त दोन अश्रू ..
ढळणार कुणीतरी असावं..

वर वर नाही दाखवले..
प्रेम माझेवर जरी ...
तरी आतून त्याचं ..
दु:ख खरं असावं ..
फक्त माझे साठी तडफडणार ..
कुणी तरी आपलं हक्काचं असावं...

उद्या मी गेल्यावर ..
सर्व काही इथेच असेल ...
सर्व काही सुरळीत चालू राहील ..
काही फरक पडणार नाही जगाला ..पण
भिंतीवरील माझ्या फोटोकडे पाहून ..
ओठावर हसू आणि ..
डोळ्यात वेदना ठेवणारं कुणीतरी असावं ..

उद्या मी गेल्यावर ...
विसरले सारे जग तरीही
माझी आठवण ठेवून ..
श्वास घेणारं कुणी तरी आपलं असावं ..

उद्या मी गेल्यावर ..
माझेसाठी रडणारं..
माझेसाठी झुरणारं..
माझे आठवणी वेडं होणारं..
कुणीतरी खास आपलं असावं ..

उद्या मी गेल्यावर ..
माझ्या आठवणीत ..
जागून रात्र काढणारं..
माझ्या फक्त कुशीत शिरण्यासाठी ..
तळमळणार कुणीतरी नक्कीच असावं ....!

सनी ...एक वेडा मुलगा..!

Thursday, May 19, 2011

बघ जमतंय का ..?

मनात असणारी प्रत्येक गोष्ट ..
शब्दात सांगता आली असती तर ..
मनातलं प्रेम आणि भावना
बोलून दाखवता आली असती तर ..
मला तू खूप आवडतेस ..
हे सहज सांगता आले असते तर ...?

तुझेशिवाय जग हे सुने आहे ..
तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही
हे तुला पटवून देता आले असते तर ..
तुझी रोज येणारी आठवण
विसरून जाता आली असती तर ....?

तूच सर्वस्व नाही आहे ..
तुझ्या पलीकडे पण काहीतरी आहे ..
हे जाणून घेता आले असते तर ..
माझे सुद्धा अस्तित्व आहे ..
हे समजून घेता आले असते तर ..?

तू फक्त माझी आहेस
हे तुला न सांगता कळलं असतं तर ..
तू अशीच जवळ राहा ..
हे स्पर्शाने सांगता आलं असतं तर ..
तू जेव्हा जवळ नसतेस ..
तेव्हा पण तुझा स्पर्श जाणवला असता तर ..
किती छान झाले असते ..
तुला माझे मन वाचता आले असते तर .....?

शब्दांच्याही पलीकडे काही तरी असतं..
हे नजरेनेच जाणता आलं असतं तर ..
हे सर्वच ..तर नाहीसे होतील कदाचित ,,
तू फक्त म्हणालीस तरी .. कि ..
मी फक्त .............!
म्हणशील .....?
बघ जमतंय का ..?
प्रयत्न तर कर ......!


सनी ....एक वेडा मुलगा ...!

Monday, May 9, 2011

पण आज ठरवलंय ..सर्व तिला सांगायचं ..!

ती समोर दिसली कि ओठातले शब्द
मूक होऊन जातात ..
डोळ्यात दाटलेले भाव तसेच
डोळ्यातच विरून जातात ....!

तिच्याकडे पाहिलं कि नुसत पाहतच
राहतो एकदम स्तब्ध होऊन ..
आणि मग तीही तशीच निघून जाते ..
शब्दाने हि विचारले नाही म्हणून रागावून...!

चंद्र तारे तोडून आणून द्यावे असे मनात येते
पण हे कसे शक्य आहे लगेच ध्यानात येते ..!

मग मी विचार करतो फुलच द्यावे ..
पण ते द्यायची हि हिम्मत होत नाही ..
म्हणून मी त्या बाजूला जातच नाही ...!

मग एखाद्या पुस्तकात ते फुल तसंच सुकत जाते
रात्रभर केलेली हिम्मत अन तयारी फुकट जाते ..

तिच्या मनात काय आहे हे कळत नाही ..
पण माझं मन तीचेशिवाय काही मागत नाही ..!

पण आज ठरवलंय ..सर्व तिला सांगायचं ..
तिच्या साठी असलेलं आयुष्य तिच्या स्वाधीन करायचं ..!

का कुणास ठाऊक ..
तिच्याही एखाद्या पुस्तकात ..
माझेसाठीची सुकलेली फुलं असतील .....!


सनी... एक वेडा मुलगा..!

Saturday, April 30, 2011

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन गेलात .

बाबा लोक सोन्याचा चमचा तोंडात
घेऊन जन्माला येतात ..
इथे मात्र तुम्ही चमच्यापासून ..
संसार उभा केलात ...!

बाबा तुमच्या मित्रांकडे ..
सुख पायदळी लोळत होते ..
पण तुम्ही मात्र ..
शून्यातून विश्व निर्माण केले .. !

हाती घेतलेले काम
पूर्ण करावे असे सांगणारे तुम्ही ..
आम्हाला मात्र अर्ध्या
प्रवासात सोडून गेलात ..?

जन्मभर थोरामोठ्याना
आधारस्तंभ वाटलात ..
पण तुमच्या लाडक्या चिमण्यांना ..
मात्र निराधार करून गेलात ...?

जन्मभर जिद्दीने जगलात तुम्ही
पण त्या मृत्युपुढे मात्र हात टेकवले ...!

आपल्या लाडक्या मुलांसाठी कष्ट
उपसत राहिलात आयुष्यभर
त्यांचे सुख अनुभवायला ....
का नाही थांबलात हो बाबा ....!

खाच खळग्यातून अवघड वळणावरून
आम्हाला सर्वाना घेऊन पुढे आलात
पायवाट सोपी दिसू लागताच
मागे काहो वळलात ..?

कष्टापासून एकदम दूर ठेवणार
होता ना हो बाबा आम्हाला ..?
मग या कोवळ्या खांद्यांना तुम्हाला
उचलायाचे कष्ट का हो दिले ....?

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत त ठेऊन गेलात ..
शेवटी एका प्रश्नाच उत्तर द्या मला बाबा ..
तुम्ही एवढे चांगले का होता ?
कि त्या ईश्वरालाही आवडलात ........!!



सनी ..एक वेडा मुलगा ...!

Thursday, April 28, 2011

मी माझेच अस्तित्व विसरून गेलो .....!

वाटेत अडचणी अनंत अडचणी आल्या
त्यांना तोंड देत मी गेलो
काट्यांनी भरलेला रस्ता
अनवाणीच तुडवत मी गेलो
पण ..
फुलांनी भरलेला मार्ग
फक्त दुसर्यांसाठी सोडत गेलो ....!

मोठ्या चक्री वादळालाही थोपवेल
अशीच भक्कम भिंत उभारत गेलो
जखमी हृदयची जखम माझ्या
तशीच दाबत गेलो
पण...
दुसर्याच्या दुःखाला नेहमी
हास्याचे मलम लावत गेलो ...!

माझे अश्रुनी भरलेले डोळे
नेहमीच लपवत गेलो
ओंजळीत जपलेल्या आठवणी
अश्याच सांडत गेलो
पण ...
दुसर्यांचे ओघळलेले अश्रू
पुसायला नेहमीच धावून गेलो....!

आयुष्याच्या वाटेवर असे
वळण अनेक येवून गेले .
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे
क्षणही त्यात वाहून गेले
पण ..
सगळ्यांना जपताना मात्र ..
मी माझेच अस्तित्व विसरून गेलो .....!


सनी ..एक वेडा मुलगा ........!

Monday, April 25, 2011

आठवतात अजूनही ते दिवस ......!

आठवतात अजूनही ते दिवस
घरासमोरच्या रस्त्यावर
असलेले असंख्य खड्डे
त्या खड्ड्यांशी जोडलेले
माझे अतूट नाते .........!

काही लहानपणी गोट्या खेळण्यासाठी
स्वतःचे हाताने पाडलेले..
तर क्रिकेटचे स्टंप लावताने काही ..
तर काही असेच गतकाळाच्या
आठवणी जागे करण्यासाठी
स्वतःच तयार झालेले ...
काही टवाळखोर दगडं मधूनच
वर येत अन टोचत पायाला ..
आणि
धूळमाती अंगावर घेत
वेळेचे भान पण राहत नसे तेव्हा ..

पावसाळ्यात पाणी भरायचे डबक्यात ..
आठवतात अजून
पाण्यात मारलेल्या उड्या अन
पायाला लागलेला चिखल
पसरत असे घरभर ..
आईची बोलणी ..बाबांचा मार
पुन्हा जावून स्वच्छ पाण्याने ..
पाय धुणे ....

पण ...
आता डांबरीकरण झाल्यावर
सपाट अन मऊ रस्त्यावरून चालताना ..
उगाच पाय कुठेतरी ठेचकाळतो ..
काहीतरी टोचत पायाला...
आणि मग ...
पायाला चिखल लागल्याचा
भास होतो ...
फक्त भास ..
मनातून जाता जात नाही ......!

सनी ..एक वेडा मुलगा ....!

Saturday, April 23, 2011

छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर.....!

मला विकत घ्यायचेय एक ..
छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर
आहे का कुणाच्या पाहण्यात...?
कुठे मिळेल का हो ?
चालेल अगदी कुठेही ..
शहरात नाही आहे ...
उपनगरात पण चालेल ..
कुणीतरी येणार आहे माझेबरोबर ..
जन्मोजन्मी राहिला ..
हो तसे वचन दिलेय तिने मला ......!

घर हवे आहे हो मला ..
मी सजविल त्या घराचा
एक छोटासा हॉल...
छोटीसी बेडरूम
माझं एक टेबल
एक पानांचा रिम
आणि एक मस्त पेन
मला कविता करायला ......!

एक खिडकी ..मोठी
खिडकीतून दिसावे एखादे झाड ..
नि मस्त आकाश ..
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि निवांतपणा
मिळेल का असे घर मला ?
छानसे स्वप्न आहे हो माझे .....!

त्या घरात असेल ती आणि मी
टेरेस मधून बघणार आम्ही
कोसळणारा मुसळधार पाऊस...
उडतील थोडेसे शिंतोडे...
आमच्या अंगावर ..
ती हात पुढे करून घेईल हातावर पडणारं
पावसाचं पाणी ..
अन हळूच फेकणार माझ्या चेहऱ्यावर ....
एक स्वप्नातील गोड स्वप्न ....!

बसू जेव्हा आम्ही बेडरूम मध्ये ..
खिडकीतून चंद्राचा प्रकाश येईल सर्व अंगावर
असंख्य तारायांचे तांडव चालेल मग आकाशात ..
एक तारा हळूच निखळून पडेल खाली ..
हि सरसावेल पुढे ..
अजून एक काहीतरी नवीन मागणं मागण्यासाठी ....!

हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ..माझे अन तिचे
बघा न प्लीज असेल तर माझे साठी ..
छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर.....!


सनी ..एक वेडा मुलगा

Thursday, April 21, 2011

निष्पर्ण...अगदी वाकलेलं एक झाड ...!


कित्तेक वर्षापासून ते झाड उभं आहे ..
सताड ! एक हि पान नसलेलं !
म्हतारपणा मुळे अगदी वाकलेलं...
जीर्ण ! उघडं !

आजकाल पक्षी हि फिरकत नाहीत त्याचेकड .
नाही बांधत घरटे आपल्या पिलांसाठी ..!
पण वृक्ष असुरलेला पक्षांसाठी ...!!
बांधारे घरटे कुणीतरी ..माझ्या फांदीवर ..!
काहीही न देता ..
अगदी तशेच येवून राहा माझेसोबत ..
बांधा घरटे ...!

रात्रभर तेवढीच सोबत मला ..
भीती वाटते रे एकटेपणाची ..
एक दिवस कुणीतरी येवून ..
नष्ट करेल मला ..
आणि नेतील मला जाळायला ..
आपलं टीचभर पोट भरण्यासाठी .....!

पण पक्षी येतात ..
अगदी थंडीमध्ये ..
फांदीवर सरळ रेषेत बसतात ..
सकाळचं उन खात ..
स्वतःचा स्वार्थ बघत ..
फक्त तेव्हाच आठवण येते माझी ...
आणि दुपार झाली ..
उन वाढले कि उडून जातात ....!

रात्री एकटंच ते झाड मग ..
आठवत बसतं ..आपला भूतकाळ ...
आपलं गतकाळच वैभव ..
माहित असतं त्यालाही ..
कधीही वणवा लागेल..
आपल्या संपलेल्या भूतकाळाच्या
हिरव्या क्षणांच्या आठवणीला ..!

म्हातारी माणसे हि असे असतात
त्या निष्पर्ण झाडासारखी ..
परदेशी असणाऱ्या मुलाची ..
अन वेगळे राहणाऱ्या मुलांची ..
वाट बघत ..वेड्यासारखी ...
स्वप्नात गुंतत ...
यारे या ..
आनंदाचा एक क्षण राखून ठेवलाय ..
तुमच्यासाठी  ...!



सनी ..एक वेडा मुलगा ....!

Wednesday, April 20, 2011

ती आणि मी .......!

ती आणि मी ....
दोघेही एका गावात राहत होतो
जेव्हा गोष्ट घडली आहे ..
त्याआधी फक्त स्वप्नच पाहत होतो ...
स्वप्नातच एकमेकांच्या खूप जवळ
येत होतो ..
येता जाता नुसता आणाभाका खात होतो
एका नजरेसाठी तिच्या कासावीस होत होतो ..
तिचे हास्य ..
तिची गालावर पडणारी खळी..
तिची मोहक अदा ..
सर्व फक्त स्वप्नातच....
नंतर ...
मोठी जातीची भिंत आडवी झाली
दोघांनाही दोन भागात विभागून गेली..
हृदयाला गेलेले असंख्य तडे ..
स्वप्नाचा झालेला चक्काचूर ...
आजही मला आठवतो आहे ..
तेव्हापासून नजर ..
त्या रस्त्यावर आहे ..
जिथे संपेल ती भिंत तेथे भेटायचे आहे ..
गळ्यात पडून मुसमुसून रडायचं आहे ..
पुन्हा एकदा नवं स्वप्न पूर्ण करायचं आहे ..
ती माझी ..
अन मी तिचा ..
होऊन दाखवायचं आहे .............!!


सनी ..एक वेडा मुलगा ...!