Saturday, April 30, 2011

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन गेलात .

बाबा लोक सोन्याचा चमचा तोंडात
घेऊन जन्माला येतात ..
इथे मात्र तुम्ही चमच्यापासून ..
संसार उभा केलात ...!

बाबा तुमच्या मित्रांकडे ..
सुख पायदळी लोळत होते ..
पण तुम्ही मात्र ..
शून्यातून विश्व निर्माण केले .. !

हाती घेतलेले काम
पूर्ण करावे असे सांगणारे तुम्ही ..
आम्हाला मात्र अर्ध्या
प्रवासात सोडून गेलात ..?

जन्मभर थोरामोठ्याना
आधारस्तंभ वाटलात ..
पण तुमच्या लाडक्या चिमण्यांना ..
मात्र निराधार करून गेलात ...?

जन्मभर जिद्दीने जगलात तुम्ही
पण त्या मृत्युपुढे मात्र हात टेकवले ...!

आपल्या लाडक्या मुलांसाठी कष्ट
उपसत राहिलात आयुष्यभर
त्यांचे सुख अनुभवायला ....
का नाही थांबलात हो बाबा ....!

खाच खळग्यातून अवघड वळणावरून
आम्हाला सर्वाना घेऊन पुढे आलात
पायवाट सोपी दिसू लागताच
मागे काहो वळलात ..?

कष्टापासून एकदम दूर ठेवणार
होता ना हो बाबा आम्हाला ..?
मग या कोवळ्या खांद्यांना तुम्हाला
उचलायाचे कष्ट का हो दिले ....?

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत त ठेऊन गेलात ..
शेवटी एका प्रश्नाच उत्तर द्या मला बाबा ..
तुम्ही एवढे चांगले का होता ?
कि त्या ईश्वरालाही आवडलात ........!!



सनी ..एक वेडा मुलगा ...!

Thursday, April 28, 2011

मी माझेच अस्तित्व विसरून गेलो .....!

वाटेत अडचणी अनंत अडचणी आल्या
त्यांना तोंड देत मी गेलो
काट्यांनी भरलेला रस्ता
अनवाणीच तुडवत मी गेलो
पण ..
फुलांनी भरलेला मार्ग
फक्त दुसर्यांसाठी सोडत गेलो ....!

मोठ्या चक्री वादळालाही थोपवेल
अशीच भक्कम भिंत उभारत गेलो
जखमी हृदयची जखम माझ्या
तशीच दाबत गेलो
पण...
दुसर्याच्या दुःखाला नेहमी
हास्याचे मलम लावत गेलो ...!

माझे अश्रुनी भरलेले डोळे
नेहमीच लपवत गेलो
ओंजळीत जपलेल्या आठवणी
अश्याच सांडत गेलो
पण ...
दुसर्यांचे ओघळलेले अश्रू
पुसायला नेहमीच धावून गेलो....!

आयुष्याच्या वाटेवर असे
वळण अनेक येवून गेले .
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे
क्षणही त्यात वाहून गेले
पण ..
सगळ्यांना जपताना मात्र ..
मी माझेच अस्तित्व विसरून गेलो .....!


सनी ..एक वेडा मुलगा ........!

Monday, April 25, 2011

आठवतात अजूनही ते दिवस ......!

आठवतात अजूनही ते दिवस
घरासमोरच्या रस्त्यावर
असलेले असंख्य खड्डे
त्या खड्ड्यांशी जोडलेले
माझे अतूट नाते .........!

काही लहानपणी गोट्या खेळण्यासाठी
स्वतःचे हाताने पाडलेले..
तर क्रिकेटचे स्टंप लावताने काही ..
तर काही असेच गतकाळाच्या
आठवणी जागे करण्यासाठी
स्वतःच तयार झालेले ...
काही टवाळखोर दगडं मधूनच
वर येत अन टोचत पायाला ..
आणि
धूळमाती अंगावर घेत
वेळेचे भान पण राहत नसे तेव्हा ..

पावसाळ्यात पाणी भरायचे डबक्यात ..
आठवतात अजून
पाण्यात मारलेल्या उड्या अन
पायाला लागलेला चिखल
पसरत असे घरभर ..
आईची बोलणी ..बाबांचा मार
पुन्हा जावून स्वच्छ पाण्याने ..
पाय धुणे ....

पण ...
आता डांबरीकरण झाल्यावर
सपाट अन मऊ रस्त्यावरून चालताना ..
उगाच पाय कुठेतरी ठेचकाळतो ..
काहीतरी टोचत पायाला...
आणि मग ...
पायाला चिखल लागल्याचा
भास होतो ...
फक्त भास ..
मनातून जाता जात नाही ......!

सनी ..एक वेडा मुलगा ....!

Saturday, April 23, 2011

छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर.....!

मला विकत घ्यायचेय एक ..
छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर
आहे का कुणाच्या पाहण्यात...?
कुठे मिळेल का हो ?
चालेल अगदी कुठेही ..
शहरात नाही आहे ...
उपनगरात पण चालेल ..
कुणीतरी येणार आहे माझेबरोबर ..
जन्मोजन्मी राहिला ..
हो तसे वचन दिलेय तिने मला ......!

घर हवे आहे हो मला ..
मी सजविल त्या घराचा
एक छोटासा हॉल...
छोटीसी बेडरूम
माझं एक टेबल
एक पानांचा रिम
आणि एक मस्त पेन
मला कविता करायला ......!

एक खिडकी ..मोठी
खिडकीतून दिसावे एखादे झाड ..
नि मस्त आकाश ..
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि निवांतपणा
मिळेल का असे घर मला ?
छानसे स्वप्न आहे हो माझे .....!

त्या घरात असेल ती आणि मी
टेरेस मधून बघणार आम्ही
कोसळणारा मुसळधार पाऊस...
उडतील थोडेसे शिंतोडे...
आमच्या अंगावर ..
ती हात पुढे करून घेईल हातावर पडणारं
पावसाचं पाणी ..
अन हळूच फेकणार माझ्या चेहऱ्यावर ....
एक स्वप्नातील गोड स्वप्न ....!

बसू जेव्हा आम्ही बेडरूम मध्ये ..
खिडकीतून चंद्राचा प्रकाश येईल सर्व अंगावर
असंख्य तारायांचे तांडव चालेल मग आकाशात ..
एक तारा हळूच निखळून पडेल खाली ..
हि सरसावेल पुढे ..
अजून एक काहीतरी नवीन मागणं मागण्यासाठी ....!

हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ..माझे अन तिचे
बघा न प्लीज असेल तर माझे साठी ..
छोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर.....!


सनी ..एक वेडा मुलगा

Thursday, April 21, 2011

निष्पर्ण...अगदी वाकलेलं एक झाड ...!


कित्तेक वर्षापासून ते झाड उभं आहे ..
सताड ! एक हि पान नसलेलं !
म्हतारपणा मुळे अगदी वाकलेलं...
जीर्ण ! उघडं !

आजकाल पक्षी हि फिरकत नाहीत त्याचेकड .
नाही बांधत घरटे आपल्या पिलांसाठी ..!
पण वृक्ष असुरलेला पक्षांसाठी ...!!
बांधारे घरटे कुणीतरी ..माझ्या फांदीवर ..!
काहीही न देता ..
अगदी तशेच येवून राहा माझेसोबत ..
बांधा घरटे ...!

रात्रभर तेवढीच सोबत मला ..
भीती वाटते रे एकटेपणाची ..
एक दिवस कुणीतरी येवून ..
नष्ट करेल मला ..
आणि नेतील मला जाळायला ..
आपलं टीचभर पोट भरण्यासाठी .....!

पण पक्षी येतात ..
अगदी थंडीमध्ये ..
फांदीवर सरळ रेषेत बसतात ..
सकाळचं उन खात ..
स्वतःचा स्वार्थ बघत ..
फक्त तेव्हाच आठवण येते माझी ...
आणि दुपार झाली ..
उन वाढले कि उडून जातात ....!

रात्री एकटंच ते झाड मग ..
आठवत बसतं ..आपला भूतकाळ ...
आपलं गतकाळच वैभव ..
माहित असतं त्यालाही ..
कधीही वणवा लागेल..
आपल्या संपलेल्या भूतकाळाच्या
हिरव्या क्षणांच्या आठवणीला ..!

म्हातारी माणसे हि असे असतात
त्या निष्पर्ण झाडासारखी ..
परदेशी असणाऱ्या मुलाची ..
अन वेगळे राहणाऱ्या मुलांची ..
वाट बघत ..वेड्यासारखी ...
स्वप्नात गुंतत ...
यारे या ..
आनंदाचा एक क्षण राखून ठेवलाय ..
तुमच्यासाठी  ...!



सनी ..एक वेडा मुलगा ....!

Wednesday, April 20, 2011

ती आणि मी .......!

ती आणि मी ....
दोघेही एका गावात राहत होतो
जेव्हा गोष्ट घडली आहे ..
त्याआधी फक्त स्वप्नच पाहत होतो ...
स्वप्नातच एकमेकांच्या खूप जवळ
येत होतो ..
येता जाता नुसता आणाभाका खात होतो
एका नजरेसाठी तिच्या कासावीस होत होतो ..
तिचे हास्य ..
तिची गालावर पडणारी खळी..
तिची मोहक अदा ..
सर्व फक्त स्वप्नातच....
नंतर ...
मोठी जातीची भिंत आडवी झाली
दोघांनाही दोन भागात विभागून गेली..
हृदयाला गेलेले असंख्य तडे ..
स्वप्नाचा झालेला चक्काचूर ...
आजही मला आठवतो आहे ..
तेव्हापासून नजर ..
त्या रस्त्यावर आहे ..
जिथे संपेल ती भिंत तेथे भेटायचे आहे ..
गळ्यात पडून मुसमुसून रडायचं आहे ..
पुन्हा एकदा नवं स्वप्न पूर्ण करायचं आहे ..
ती माझी ..
अन मी तिचा ..
होऊन दाखवायचं आहे .............!!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

Monday, April 18, 2011

भ्रष्टाचार - भ्रष्टाचार सगळी कडे माजला आहे ......!

सरकारी कामे सुद्धा पैश्या शिवाय होत नाही ..
गाडी पकडली पोलिसाने लायसेन्स नसेल तुमचेकडे
शंभर रुपये सरकवले तर इथे काही होत नाही
भ्रष्टाचार - भ्रष्टाचार सगळी कडे माजला आहे ..
म्हणूनच आज देश विकायला काढला आहे ..!
कुणी घेणार का हो ? देश माझा विकायचा आहे ....!

एकीकडे गावामध्ये अन्नासाठी पोरं रडत आहे ..
अन सरकारी गोडावून मध्ये सारा गहू सडत आहे ..
शिक्क्याचे पोते बदलून रेशनचा गहू बाहेर विकत आहे.
शाळेतील पोरांचा तांदूळ वाण्याच्या दुकानात जात आहे .
सगळी कडे लक्ष द्यायला ..सरकार ला वेळ नाही ..
सरकारी कामे सुद्धा पैश्याशिवाय होत नाही ....!
दुसरा काही तरी पर्याय शोधायचा आहे ...
कुणी घेणार का हो ? देश माझा विकायचा आहे ....!

काही विरोधक येवून रंगेहात पकडून देतात
पेपर मध्ये छापून आलेवर ते पण विसरून जातात
इकडे तिकडे सरकून पोलीस स्टेशन मधेच केस बंद होते ..
इलेक्शन आलेवर भाषण करताना त्यांना पुन्हा जाग येते ..
त्यांची काही चूक नाही चूक तर आपली आहे .
तेव्हा पाचशे रुपये घेऊन मत आपण विकले आहे ..
नको ते लोक पाठवून चूक आपण केली आहे ..
आणि या भ्रष्टाचारामुळे माणुसकीही मेली आहे ...!
आता यापुढे फक्त होणारा अन्याय पाहिचा आहे ..
कुणी घेणार का हो ? देश माझा विकायचा आहे ....!

पैसे सरकवून परदेशी सुद्धा इथलेच होऊन राहिलेत ..
सक्खे भाऊ सुद्धा इथले परके होऊन राहिलेत
देश सेवा लुटणारे इथे उजळ माथ्याने सुटले ..
आणि देशसेवा करणारांचे डोके इथे फुटले ..
आंदोलन करणारांना फटके मारून अटक इथे होते ..
अन बॉम्बस्फोट करणारांचे स्वागत राजेशाही थाटात होते
अंध देवतेच्या तराजूत अन्याय हा तोलायचा आहे ..
कुणी घेणार का हो ? देश माझा विकायचा आहे ....!

किती आता सहन करायचे विरोध करायला आता तरी एकत्र या
शिवाजी जन्माला यावा पण दुसर्याच्या घरात हे आता तरी सोडून द्या.. ?



सनी ..एक वेडा मुलगा

Saturday, April 16, 2011

लाडकी बहिण माझी .... ..!


जरी नसेल ती माझ्या रक्ताच्या नात्याची ..
नसेल माझ्या आईच्या कुशीत वाढलेली ..
नसेल माझ्या पाठीवर माझा हात धरून आलेली ..
तरीही आहेच तेवढीच जिवलग अन लाडकी बहिण माझी .....!

ती माझ्या जीवनात आली आणि माझीच झाली
बनली होती माझ्या जिवाभावाची मैत्रीण
आता जुळलं नातं आमचं एक जिवलग भाऊ -बहिण
माझ्या इच्छेसारखीच भेटली मला जिवाभावाची बहिण...!

स्वभाव तिचा खूपच प्रेमळ पण जरासा हळवाच असलेला
खूपच मुडी आणि रागाचा पारा जवळच असलेला
असेलही तुसडी इतरांसाठी आठवत नाही मला माझेवर रागावली कधी ..
कितीही बोललो केली मस्करी पण नाही तिनं परकं मानलंच कधी  ...!

जाईल जेव्हा ती आपल्या हक्काच्या घरी ..
ओठावर हसू मनी आनंद अन नयनी येईल पाणी
राखीच्या सणाला तिला बोलवूया
ओवाळून जवळ घेईल तिला तिचा हा भाऊराया....!

तिची अशीच प्रेम आणि माया माझेवर राहू दे ..
हे देवराया फक्त हि एकच इच्छा माझी पुरी होऊ दे ......!!


सनी..एक वेडा मुलगा .....!

Thursday, April 14, 2011

देशील ......................................?


तू आता माझी नाहीस तेव्हा जास्त नाही मागणार तुझ्याकडे
पण...जे काही मागेल ते मात्र आठवणीने दे ...!

तू फक्त माझीच हो असे नाही मागणार तुझ्याकडे
पण ...कधीतरी माझे आठवणीत सांडलेला एक अश्रू मात्र आठवणीने दे ...!

पाण्याने भरलेले सारेच नभ नाही मागणार तुझ्याकडे
पण...त्या नभातून बरसलेला पाण्याचा एक थेंब मात्र आठवणीने दे ...!

चांदण्यांनी लक्ख झालेले आकाश नाही मागणार तुझ्याकडे
पण... त्यातून निखळनारा एक तारा मात्र आठवणीने दे ...!

मुसळधार कोसळणारा पाऊस नाही मागणार तुझ्याकडे
पण... त्यातून येणारी थंड हवेची एक झुळूक मात्र आठवणीने दे ...!

बेधुंद करणाऱ्या रातराणीचा अंगणात पडणारा सडा नाही मागणार तुझ्याकडे
पण ... जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे ....!

उंच उंच आकाशाला भिडणारे हिरवेगार डोंगर नाही मागणार तुझ्याकडे
पण...त्या डोंगरावरील एक रोपटं मात्र आठवणीने दे .....!

फक्त माझ्यासाठीच धडधडणारे हृदय नाही मागणार तुझ्याकडे ..
पण ..माझेसाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे ....!

देशील ......................................?

सनी ..एक वेडा मुलगा

Tuesday, April 12, 2011

तुझंच प्रेम शोधत आहे .....!!

तुला आठवतं ते आपलं नेहमीचं हॉटेल
आणि तेच सर्वात मागचं टेबल ..
त्यावर आज थोडी धूळ साचलेली.
हळुवार हात फिरवला ..तर ..
तेच तू काढलेलं आपलं छोटंसं गाव ..
आणि त्यावर लिहिलेलं दोघांचे नाव....!

अन ..मन माझं पुन्हा एकदा मागे गेलं..
अगदी एकदम सर्वकाही काल घडल्या सारखं
जाळीदार पानावर पहाटेचं दव पडल्यासारखं
मला तुझं प्रेम कळावे म्हणून तू केलेला शब्दांचा खेळ
आणि सर्व समजूनही मी राहिलेलो अबोल ....!

मला आवडणारा ड्रेस तू घातलेला ..
पण जाणवू दिला नाही मी प्रसंग माझेवर बेतलेला ..
मलाही समजत होतं..
मी आलेवर ..मी येते म्हणणारी तुझी मैत्रीण हुशार ..
आणि तू दिसलेवर माझे मित्रही होणार लगेच पसार ..

रोज अजून थोडावेळ थांबू ना .. बोलणारी तू ...
अन घरी जाण्याची घाई करणारा मी ..
दोघामध्ये एकच घेतलेला तो चहाचा कप ...!
तोही केविलवाणे हसत बघायचा माझेकडे ....!

डोळ्यात डोळे घालून ..आयुष्यभर साथ देशील ..
असे विचारणारी तुझी भावूक नजर ..
प्रतीक्षा माझ्या उत्तराची ..
अन ..उत्तर ऐकताच ..
केलेली घाई अश्रू लपवण्याची ....!!

तुला नाही म्हणून गेलो तुझे पासून दूर ..
घरी आलेवर भरून आला अश्रूंचा पूर ..
आता चहाच्या चटक्याने भानावर आलो ...
स्वप्नं सारे भूतकाळात विसरून गेलो ..

पण ..
या सगळ्यातून बाहेर आलेला मी ..
कायम तुझेसाठी कुढत आहे ..
आणि त्या चहाच्या कपात अजूनही ..
तुझंच प्रेम शोधत आहे .....!!


सनी ..एक वेडा मुलगा ...!!

Sunday, April 10, 2011

तू फक्त सुखी राहा ....एवढेच मागेल मी ..

तुझ्यात किती सहज समरस झालो ..
तितक्याच सहजतेनं ठरवून दुरही झालो ..
पण तुझ्या आठवणी  ..कसा दूर जाऊ त्यांच्या पासून ..?

तुझेसोबात असताने कायम हसत राहिचो ..
पण.. आता हास्यच गायब झालाय चेहऱ्यावरचे ..
आणि कारण असून रडू सुद्धा येत नाही आजकाल मला .....!

पूर्वी तुझेसोबत चालताना किती चाललोय याचं भान नसायचं..
आज एकटा चालताना बघून ती वाटही हसते बघून माझेकड
म्हणूनच आजकाल तिला वाईट वाटू नये म्हणून
मी फिरणंच बंद केलंय त्या वाटेने ....!!

तू भेटणे अगोदर फुलांचा गंधहि नव्हता मला ..
पण तू दिलेला गुलाब सुकलाय पण तरीही जपून ठेवलाय ..
तुझ्या बाबतीत मी हेच तर केलंय ...!

तुझा हात कधी हातात येयील असा वाटलच नव्हतं..
आणि आलेवर लगेच सुटेल असा विचार पण केला नव्हता..
मला वाटतंय जगेन तुझेशिवाय ..पण मला वाटतंय तसा होतंय कुठे ?

तुला आठवतंय .. एकदा तू तुझा स्कार्फ विसरली होतीस ..
मी हि तो छान घडी करून  जपून ठेवला होता ..
पण आता तू मला विसरलीस
तेव्हा..स्वतःला तसं जपणं सुद्धा कठीण आहे ग मला .....!!

पण .. तू नकोस काळजी करूस माझी ...
जगेल मी कसाही ..एक भावनाशून्य दगड होऊन ..
तू फक्त सुखी राहा ....एवढेच मागेल मी ..
असेल काही माझे हातून चांगले घडले तर त्या ...दगडाच्या देवाजवळ ......!!
ज्याला कुठल्याच भावना नाहीत अश्या .. त्या दगडाजवळ .....!!

सनी ..एक वेडा मुलगा ....!!

Friday, April 8, 2011

नको होतास तू मला ......!!


रणरणत्या उन्हात पावसाची थंडगार सर यावी ..
असाच तू माझ्या आयुष्यात आलास ...
मला तू नकोसा वाटत असतानाही ...
जुन्या जखमेवर फुंकर घालून गेलास ....!

त्या नंतर मी ठरवून खूप बदलले होते
तू जवळ येण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते
पण  ..तू माझे  मन निस्वार्थीपणे जपले ..
मला हेच कळत नाही एवढे कुठून शिकले ..!

तुला दुखावताना मन जड माझे व्हायचे
तुझे प्रेम कळत असूनही निर्णय मी घ्यायचे
पूर्वी मागितलेले प्रेम न सांगता देत होता
सर्व मिळूनही माझेकडून तुला नाकारणे हा गुन्हा घडत होता ..

माझेवर प्रेम करतोस सांगताना डोळे तुझे भरून आले
शब्द कमी पडताना ..अश्रू सारे बोलून गेले ..
तुझे प्रेम बघून हृदय माझे भरून आले ..
मी सारे निर्णय तोडून माझे ..तुझे अश्रू पुसू लागले ...!!


सनी ..एक वेडा मुलगा ..

Thursday, April 7, 2011

व्येथा शेतकऱ्यांची .....!


शेती मी करतो कसं विसरू .
हि शेती माझी आई ..
मरमर कष्ट करून सुद्धा
काहीच मिळत नाही ....!

सरकारच्या मोठ्या योजना
कागदावरच राहून गेल्या
सह्या फक्त घेऊन गेले
योजना कधी न आल्या ......!

निसर्ग पण कोपतो आमचेवर
पाऊस वेळेवर येत नाही
कर्ज वाढते खंडीभर
सावकार दारात उभा राही .....!

चूल माझ्या घरची
कितीदा तरी पेटत नाही
पोरं रडतात भाकरीसाठी
घरात अन्नाचा कणही शिल्लक नाही ....!

खिसा आमचा पूर्ण रिकामा त्यांचे शाळेसाठी ..
शिक्षणाचं वय निघून गेलं पोरं झाली मोठी ..
त्यांचे काबाडकष्ट सुरु झाले ..
आमचेच मागचे दिवस पुढे आले ....!!

कर्ज वाढता वाढत गेले ..
सावकाराकडे जमीन गेली .
गाय - बैल  बँकेने ओढून नेले
संसार आमचे रस्त्यावर आले ....!!

अन मग एक दिवस ......

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
आई निपचीत पडलीय
हृदय फाटणारा आक्रोश धरणीवर...........!!



सनी ..एक वेडा मुलगा ....!!



सनी ..एक वेडा मुलगा ....!!

Tuesday, April 5, 2011

खरच आयुष्य असेच असते का... ??


खरच आयुष्य असेच असते का... ??
जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ..
अपयश झेलायचं..आणि ..
तरीही रोज नव्या उमेदीनं उठायचं ....!

आयुष्यभर चालता चालता ..
जीवनातील चढ -उतार ना सामोरं जायचं..
कुठेतरी ठेच लागून पडायचं ..
वळून बघायचं..कुणी पाहिलं नाही ना ..
म्हणून परमेश्वराचे आभार मानायचं..
आणि पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखा
नव्या जोमानं चालायला लागायचं.....!

सुखाच्या क्षणांना हाय - बाय करायचं ..
आणि दु:खाशी मात्र घट्ट नातं ठेवायचं ....!
कुणाकडूनही कशाची हि अपेक्षा न ठेवता ..
त्यांच्या अपेक्षांचं भान ठेवायचं....!

आपल्या साऱ्या इच्छा मनात ठेवून ..
कुढत कुढत जगायचं ...
नको असलेल्या गोष्टीमध्येच समाधान मानायचं..
अन ..प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव तुटेपर्यंत झगडायचं ....!

खरच आयुष्य असेच असते का .....??


सनी ..एक वेडा मुलगा ...!